Sakal Money exclusive...
भारतात विमा घेणाऱ्यांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. अलीकडच्या काळात आयुर्विमा आणि आरोग्य विम्याविषयी जागृती झाली असली तरी ती पुरेशी नाही. प्रामुख्याने विमा एजंट असलेल्या मित्राने किंवा नातेवाईकाने सांगितले म्हणून विमा काढणारे किंवा टॅक्स वाचविण्यासाठी म्हणून विमा घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. भविष्यात जर नुकसान झाले तरच विम्याचा आर्थिक पातळीवर फायदा होतो अन्यथा नुकसानीचे संरक्षण म्हणून जमा केलेले पैसे परत मिळत नसल्याने विमा घेणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. अशावेळी मध्यम मार्ग म्हणून विमा आणि गुंतवणुकीची सांगड घालणाऱ्या मनी बॅक /एन्डॉवमेंट किंवा युलिप योजना घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. मात्र विम्याचा मूळ हेतू लक्षात घेऊन आणि योग्य विम्याची निवड केली तर त्याचा मोठा फायदा कसा होऊ शकतो हे 'विम्बल्डन टूर्नामेंट'च्या विमा प्रकरणावरून आपल्या लक्षात येईल.
काय आहे हे प्रकरण?
टेनिस जगतात मानाच्या समजल्या जाणाऱ्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी विम्बल्डन ही एक स्पर्धा आहे. लंडन येथे ऑल इंग्लंड क्लबच्या ग्रास कोर्टावर / हिरवळीच्या कोर्टावर खेळली जाणारी एकमेव टेनिस टूर्नामेंट म्हणून या स्पर्धेचा लौकिक आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील जून -जुलैच्या दरम्यान ही स्पर्धा भरविण्यात येणार होती. मात्र, जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला. फोर्ब्सच्या वृत्तानुसार, स्पर्धा रद्द झाल्याने संयोजकांना मीडिया प्रक्षेपण हक्क, स्पॉन्सरशिप आणि तिकीट विक्रीच्या माध्यमातून मिळणाऱ्या तब्बल २४०० कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी पडले. मात्र अशावेळी आधार दिला तो विमा पॉलिसीने!
2003मध्ये सार्स या विषाणूने जगभरात खळबळ माजवली होती. कोविड 19 इतका त्याचा प्रादुर्भाव झाला नसला तरी त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात प्राणहानी आणि वित्तहानी झाली होती. सार्सच्या संकटावरूनच 'विम्बल्डन'च्या संयोजकांना भविष्यातील संकटाची चाहूल लागली. त्यामुळे खबरदारी घेत त्यांनी स्पर्धेसाठीचा 'पँडेमिक इन्श्युरन्स / महामारी विमा' काढून घेतला. जेणेकरून भविष्यात जर सार्स सारखी महामारी उद्भवलीच आणि स्पर्धा रद्द करावी लागली तर मोठ्या आर्थिक नुकसानीचा फटका बसू नये.
या विम्यासाठी संयोजक प्रत्येक वर्षाला 15 कोटी रुपयांचा (1.9 मिलियन डॉलर्स) प्रीमियम भरत आहेत. त्यानुसार 2003 ते 2020 या कालावधीत संयोजकांनी 258 कोटी रुपयांचा प्रीमियम भरला. दुर्दैवाने यावर्षी कोरोनामुळे स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र संयोजकांनी दाखविलेली दूरदृष्टी किंवा जोखीम व्यवस्थापन कामी आले आणि संयोजकांना भरलेल्या प्रीमियमपोटी 1069 कोटी रुपयांचे 'विमा कव्हर' मिळाले. त्यामुळे स्पर्धा रद्द झाली असली तरी संयोजकांना 1069 (141 मिलियन डॉलर्स) कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.
आयुर्विमा किंवा हेल्थ विम्यापलीकडे देखील बघण्याची गरज
विम्बल्डनच्या उदाहरणावरून आपण देखील फक्त आयुर्विमा किंवा हेल्थ विमा यापुरतेच मर्यादित न राहता प्रॉपर्टी विमा, फायर विमा, लायबिलिटी / कर्जावरील विमा याविषयी माहिती घेऊन त्याचा फायदा घेतला पाहिजे.